बदलता खो-खो
या भागात आपण जुन्या खो-खो चा आणि त्यातील बदलत्या नियमांचा आढावा घेऊया. १९१४ मध्ये डेक्कन जिमखाना पुणे येथे या खेळाचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले व खो-खो खेळाला नियमांच्या सुत्रा मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळातर्फे खो-खो खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम देश पातळीवर केले गेले. तसेच राष्ट्रीय स्तरावर खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यास प्रारंभ झाला. १९६० मध्ये खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना झाली. सर्वप्रथम १९६०-६१ साली खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ची पहिली पुरुष महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. त्याच वर्षी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळातर्फे सुद्धा राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. अशा रीतीने त्या एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले गेले. नंतर मात्र तसे काही घडले नाही. तेव्हापासून या गटाच्या ५३ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. या काळात खो-खो खेळाच्या मैदानाच्या मोजमापात एकूण चार वेळा बदल केले गेले. प्रथम १९६० च्या आधी, दुसऱ्यांदा kkfi स्थापन झाल्यावर, तिसऱ्यांदा १९८३ साली तर चौथ्यांदा १९९५ मध्ये. ...