बदलता खो-खो

या भागात आपण जुन्या खो-खो चा आणि त्यातील बदलत्या नियमांचा आढावा घेऊया.

१९१४ मध्ये डेक्कन जिमखाना पुणे येथे या खेळाचे स्पर्धात्मक आयोजन करण्यात आले व खो-खो खेळाला नियमांच्या सुत्रा मध्ये बांधण्यात आले. त्यानंतर अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळातर्फे खो-खो खेळाच्या प्रसार व प्रचाराचे काम देश पातळीवर केले गेले. तसेच राष्ट्रीय स्तरावर खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यास प्रारंभ झाला. १९६० मध्ये खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ची स्थापना झाली. सर्वप्रथम १९६०-६१ साली खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया ची पहिली पुरुष महिला गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. त्याच वर्षी अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळातर्फे सुद्धा राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले होते. अशा रीतीने त्या एकाच वर्षात दोन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले गेले. नंतर मात्र तसे काही घडले नाही. तेव्हापासून या गटाच्या ५३ राष्ट्रीय स्पर्धा झाल्या. या काळात खो-खो खेळाच्या मैदानाच्या मोजमापात एकूण चार वेळा बदल केले गेले. प्रथम १९६० च्या आधी, दुसऱ्यांदा kkfi स्थापन झाल्यावर, तिसऱ्यांदा १९८३ साली तर चौथ्यांदा १९९५ मध्ये.

१९६० पूर्वी स्पर्धांमध्ये एक गडी बात केल्यास प्रतिस्पर्धी संघास दोन गुण दिले जात होते तसेच प्रत्येक फाऊल साठी अर्धा गुण वजा केला जात होता. त्यामुळे सामना जिंकल्यानंतर आक्रमण चालू ठेवल्यास व त्या आक्रमणात जास्त फाऊल झाल्यास काही वेळेस विजयी संघ सुद्धा पराभूत झालेला दिसत होता. यामुळे हा नियम बदलला गेला व प्रत्येक बाद गड्यास एक गुण हा नियम तयार करण्यात आला व आजतागायत यात कोणताही बदल नाही. १९९० पर्यंत सर्व स्पर्धा या ७ मिनिटाचा एक डाव असे चार डाव मिळून खेळल्या जात होत्या.त्यानंतर १९९० मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या फेडरेशन कप खो- खो स्पर्धेपासून एक डाव ९ मिनिटाचा करण्यात आला.  

आता मात्र २०२१ मध्ये पुन्हा एकदा खो-खो लीग सात मिनिटांची एक डाव असा खेळविण्याचा घाट घातला जात आहे. या साठी विचार विनिमय न करता हा बदल करण्याचे जाहीर करण्यात आले. नेमके याच वेळी अवघे फुटबॉल विश्व एका बातमीने ढवळून निघालेे. ती बातमी अशी की युरोपातील काही मातब्बर फुटबॉल क्लब यांनी एकत्र येऊन त्यांनी वेगळी युरोपियन सुपर लीग स्थापन करण्याची घोषणा केली.या माहितीचा संदर्भ अशासाठी इंग्लंडमधील फुटबॉल रसिकांच्या आंदोलनामुळे या नव्या लीगमधून इंग्लंडच्या मातब्बर संघाना माघार घ्यावी लागली. या वरून फुटबॉल खेळाला जो लोकाश्रय लाभला आहे,याची कल्पना येते. अर्थात आपल्या खेळाच्या बाबतीत असा दबाव टाकणे जरी शक्य नसले तरी खो-खो खेळाडू, खो-खो प्रेमीरसिक, खो-खो साठी कार्यरत असणाऱ्या विविध संस्था एकत्र आल्यास आपण हे सहज करून दाखवू शकतो.

                                                      - शानूल देशमुख

अवश्य वाचा मागील भाग खो-खो आणि महाराष्ट्र
अवश्य वाचा या मालिकेतील शेवटचा भाग तुलना बदलत्या नियमांची

टिप्पण्या

  1. खूपच सुंदर आणि परिपूर्ण माहिती, माहितीद्वारे मराठमोळ्या खो-खो खेळाचे महत्व समजण्यास निश्चित उपयोग होतो, विशेषतः मोबाईल,टिव्हीच्या गर्तेत अडकलेल्या नव्यापिढीला ही माहिती देण्यास खूप उपयोग होणार आहे, फक्त एक विनंती आहे कि खो-खो खेळाचे काही चित्तथरारक व्हिडीओ असतील,रंगतदार लढती असतील तर त्या जरूर शेअऱ कराव्यात...खूप चांगला पुढाकार मनापासून शुभेच्छा..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Olympic आणि खो-खो

तुलना बदलत्या नियमांची