तुलना बदलत्या नियमांची
जुन्या आणि नव्या खो-खो नियमांची तुलना करणे गरजेचे.
संघ रचना
- जुन्या नियमा प्रमाणे राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत एका संघात १२ खेळाडू व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १५ खेळाडू तसेच १ प्रशिक्षक व १ संघ व्यवस्थापक आहेत
- नव्या नियमा प्रमाणे एका संघात १५ खेळाडू आणि १ प्रशिक्षक, १ सहाय्यक प्रशिक्षक आणि १ संघ व्यवस्थापक असतील.
बोनस पॉइंट
- जुन्या नियमा प्रमाणे खो-खो मध्ये कुठलेही बोनस पॉईंट दिले जात नाही.
- नव्या नियमा नुसार खुंट मारून किंवा सूर मारून गडी बाद केल्यास अतिरिक्त एक गुण. संरक्षक संघाचा खेळाडूने ३ मिनिटापेक्षा जास्त संरक्षण केल्यास त्याच्या संघास एक गुण अधिक दिला जाईल.
पंच मंडळ
- जुन्या नियमानुसार एका मैदानावर १ पंच प्रमुख, २ पंच व १ गुणलेखक, १ सहाय्यक गुणलेखक आणि १ वेळाधिकारी यांची नियुक्ती असते.
- नव्या नियमानुसार एका मैदानावर १ पंच प्रमुख, २ पंच, २ सहाय्यक पंच, १ गुणलेखक, ३ सहाय्यक गुणलेखक आणि १ वेळाधिकारी असतील.
संरक्षण
- जुन्या नियमा प्रमाणे तीन खेळाडूंची एक तुकडी मैदानात येते. एकूण नऊ खेळाडू तीन तुकड्यांच्या क्रमाने संरक्षणास येतात.
- नव्या नियमा प्रमाणे प्रथम ३ खेळाडू मैदानात येतील व त्यातील एक गडी बाद झाल्यास एक खेळाडु लगेच मैदानात येईल. प्रथम बाद झालेला खेळाडु क्रमानुसार १३ व्या क्रमांकावर येईल. प्रथम तीन खेळाडू बाद झाल्या शिवाय प्रतिस्पर्धी संघास त्यांनी आपल्या आक्रमणात कितीही खेळाडू बाद केले तरी सहाच गुण दिले जातील.
आक्रमण
- जुन्या नियमा प्रमाणे पाळी समाप्त होईपर्यंत खेळ कधीही थांबत नाही. त्या मुळे खेळाची गतिमानता कायम रहात होती. व हेच या खेळाचे मुख्य आकर्षण आहे.
- नव्या नियमा प्रमाणे प्रत्येक गडी बाद केल्यावर सामना थांबेल व आक्रमक खेळाडू पुन्हा खुंटावर जाऊन सामना सुरू करेल. त्या मुळे खेळाची गतिमानता पूर्णपणे संपून जाईल.
वजीर
- जुन्या नियमात कुठेही वजीर खेळवला जात नव्हता.
- नव्या नियमात वजीर ही नवीन संकल्पना खेळात आली.यात संघातील एक खेळाडू आक्रमणाच्या वेळेस वजीर म्हणून मैदानात येईल. त्याचा वेगळा गणवेश असणार आहे. तो जेव्हां चार नंबर च्या चौकोनात आल्या नंतर तो जेव्हां गतिमान आक्रमक होईल तेव्हां त्याला स्कंद रेषेचे नियम लागू होणार नाही. व तो मुक्त क्षेत्रा प्रमाणे आक्रमण करू शकेल. एक वजीर संपूर्ण सामन्यासाठी मैदानात असेल तर अजून एक वजीर शेवटच्या एक मिनिटासाठी मैदानात असेल. अशा रितीने शेवट च्या मिनिटात दोन वजीर आक्रमणाची धुरा सांभाळतील.
खो-खो खेळ हा आक्रमक व संरक्षक अशा दोघांना समान संधी देणारा खेळ आहे. पण नवीन नियम मात्र एकतर्फी वाटतात. खेळातील हे बदल खेळाला तारक आहेत का मारक आहे. यावर सुध्दा आम्ही बोलायला तयार नाही. ही खेळातील दहशत आहे का आम्ही आमच्या खेळाला विसरुन गेलो. हे विचाराच्या पलीकडचे.
मी गेल्या चार लेखात खो-खो खेळाचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. यात मी किती यशस्वी झालो मला माहीत नाही. पण या खेळाशी संबंधित व्यक्तींचे शांत राहणे, अजिबात व्यक्त न होणे हे मला समजले नाही. खेळात केले जाणारे हे बदल ज्यांनी खो-खो लीग पुरस्कृत केली आहे त्यांच्या साठी केले की अजून कोणासाठी केले, यावर खो-खो विश्व अजून बोलायला तयार नाही.
"प्रश्न विचारायचे नाही यावर मात्र खो-खो क्षेत्रात एकमत आहे...."
- शानूल देशमुख
अवश्य वाचा मागील भाग बदलता खो-खो
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा